
पुणे : होळी व धुलिवंदन सणादरम्यान दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली. ३ मार्च २०२६ रोजी एकाच दिवशी ४५५ वाहनचालकांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सर आणि ट्रिपल सीट वाहनचालकांवरही विशेष मोहीम राबविण्यात आली, अशी माहिती पुणे शहर वाहतूक पोलिसांनी दिली.

ड्रंक अँड ड्राईव्ह: ४५५ जणांवर कारवाई
होळी-धुलिवंदनच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चौकांमध्ये नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली. दारूच्या नशेत वाहन चालविताना आढळलेल्या ४५५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
४ मार्च रोजी येरवडा येथील वाहतूक शाखा कार्यालयात २५० ते ३०० चालकांसाठी समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी पोलीस उप आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी मार्गदर्शन केले.

बुलेट सायलेन्सरवर धडक कारवाई
फेब्रुवारी २०२६ पासून सुरू असलेल्या विशेष मोहिमेत २८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटरसायकलींवर कारवाई करण्यात आली. ८७० नियमबाह्य सायलेन्सर जप्त करण्यात आले असून एकूण २८ लाख १७ हजार रुपये दंड आकारण्यात आला. त्यापैकी २३ लाख १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

४ मार्च रोजी येरवडा येथील पोलीस उप आयुक्त कार्यालयात जप्त ८७० सायलेन्सरवर बुलडोझर फिरवून त्यांचा नाश करण्यात आला, जेणेकरून त्यांचा पुन्हा वापर होऊ नये.

ट्रिपल सीटवर १५,००९ जणांवर कारवाई
फेब्रुवारी २०२६ ते आतापर्यंत १५,००९ ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. १ कोटी ४८ लाख ९५ हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली असून त्यापैकी ८८ लाख ५२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतूक शाखेने नागरिकांना मद्यपान करून वाहन चालवू नये, शांतता क्षेत्रात अनावश्यक हॉर्न वाजवू नये आणि ट्रिपल सीट प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला.

“मद्यपान करून वाहन चालविणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. सुरक्षित पुणे घडविण्यास सहकार्य करा,” असे आवाहन पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव यांनी केले.








