
न्यूयॉर्क, ११ ऑगस्ट २०२५ – बॉलिवूडचे लोकप्रिय कलाकार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे ४३ व्या वार्षिक ‘इंडिया डे परेड’मध्ये ‘को-ग्रँड मार्शल्स’ (Bollywood Icons Vijay Deverakonda & Rashmika Mandana Named Co-Grand Marshals) म्हणून सहभागी होणार आहेत. “जागतिक स्तरावरील अस्वस्थ कालखंडात, ‘सर्वे भवंतु सुखिनः’ हा सर्वांसाठी सुखनैव जगण्याचा संदेश देणाऱ्या थीम अंतर्गत ही परेड १७ ऑगस्ट रोजी मॅडिसन अव्हेन्यूवर होणार आहे,’’ असे ‘एफआयए’चे अध्यक्ष सौरिन परिख यांनी सांगितले.
फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स (FIA-NY-NJ-CT-NE) ने अलीकडेच न्यूयॉर्क येथील भारतीय वाणिज्य दूतावासात ४३ व्या वार्षिक ‘इंडिया डे परेड’चे वेळापत्रक जाहीर केले. या वेळी भारतीय राजदूत बिनया एस. प्रधान यांनी ‘एफआयए’च्या योगदानाचे कौतुक करताना म्हटले, ‘‘अर्धशतकापासून फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सने अमेरिकेत भारताच्या प्रतिमेला उंचावण्यासाठी प्रभावी भूमिका बजावली आहे. १९८१ मध्ये अत्यंत लहान प्रमाणात सुरू झालेली ही परेड आज जगातील सर्वात मोठी इंडिया डे सेलिब्रेशन परेड म्हणून माध्यमांतून गौरवली जाते.’’
१९७० मध्ये स्थापन झालेली एफआयए ही एक प्रमुख स्वयंसेवी संस्था असून, भारतीय संस्कृतीचा प्रचार, नागरी सहभाग आणि भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी, ती न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेडसारखे भव्य कार्यक्रम आयोजित करत असते. या प्रतिष्ठित आणि देशभक्तीपर कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी या सहा भाषांमध्ये विशेष संदेश देत लोकांना या कार्यक्रमाचा भाग होण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या या संपूर्ण उत्सवासाठी ‘क्रिकमॅक्स कनेक्ट’ हे प्रमुख प्रायोजक असून, पुढील दशकात अमेरिकेत क्रिकेटला फुटबॉलइतकेच लोकप्रिय करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प त्यांनी घेतला आहे.
शुक्रवार, १५ ऑगस्टपासून या परेड निमित्त कार्यक्रम सुरू होईल, ज्यात एम्पायर स्टेट बिल्डिंगवर प्रकाशयोजनेच्या माध्यमातून तिरंगा झळकवण्यात येईल. शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी टाइम्स स्क्वेअरवर भारतीय ध्वजवंदन समारंभ होईल आणि त्यानंतर पहिल्यांदाच इथे क्रिकेट सामना आयोजित केला जाईल. रविवारी, १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मॅडिसन अव्हेन्यूवर ‘इंडिया डे परेड’ सुरू होईल. न्यूयॉर्कमधील इस्कॉन आयोजित विक्रमी रथयात्रा या परेडदरम्यान मॅनहॅटनमध्ये भव्यतेने झळकणार आहे. परेडनंतर सिप्रियानी वॉल स्ट्रीट येथे ‘इंडिपेन्डन्स ग्रँड गाला’ आयोजित करण्यात आला आहे.
‘एफआयए’चे चेअरमन अंकुर वैद्य यांनी या कार्यक्रमाच्या सामुदायिक भावनेवर भर देत सांगितले, ‘‘परेडच्या व्यवस्थापनाची सर्व कामे स्वयंसेवकांकडून केली जातात. परेडनंतर आम्ही काही महत्त्वपूर्ण नवीन भागीदारी प्रकल्पांची माहितीही जाहीर करणार आहोत.’’ सौरिन परिख यांनी नमूद केले की, ”ही परेड ‘पैसे द्या आणि सहभागी व्हा’ अशा प्रकारची नसून, ‘अभिमानाने सहभागी होण्याची आहे,’ जी सर्वसमावेशकतेकडे एक क्रांतिकारक पाऊल टाकणारी असेल.”







