
चौघा अल्पवयीन मुलांकडून ४ पिस्टल, ४ जिवंत काडतुसे जप्त
पिंपरी पोलिसांची कामगिरी, गेम वाजविण्यासाठी आले होते, म्होरक्यावर खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यासह ९ गुन्हे दाखल
पुणे : एकाचा गेम वाजविण्यासाठी आलेल्या चौघा अल्पवयीन मुलांना पिंपरी पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ४ देशी बनावटीचे पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहे.
पिंपरी तपास पथकाचे पोलीस हवालदार अशोक डगळे व पोलीस अंमलदार दत्ताजी कवठेकर यांना शनिवारी बातमीदाराकडून बातमी मिळाली की, चार मुले डेअरी फार्मकडे जाणार्या रोडवर कोणाला तरी भेटण्यासाठी आले असून त्यांच्याकडे पिस्टल आहेत. या खात्रीशीर बातमीवरुन पोलिसांनी सापळा रचून चौघांना पकडले. त्या प्रत्येकाकडे प्रत्येकी १ पिस्टल व १ जिवंत काडतुसे आढळून आले. त्यांनी ही पिस्टल व जिवंत काडतुसे मध्यप्रदेशातील पप्पीसिंग (वय ३५) याच्याकडून घेतल्याचे या मुलांनी सांगितले.
ही चार ही अल्पवयीन मुले पुण्यात राहणारी आहेत. त्यातील एका १७ वर्षाच्या मुलावर सिंहगड, वारजे, चिखली, आंबेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारी, आर्म अॅक्ट अशा विविध कलमाखाली एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या एका साथीदारावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व आर्म अॅक्टखाली २ गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त संदिप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, सहायक पोलीस उपनिरीक्षक हांडे, पोलीस हवालदार डगळे, बारशिंगे, बेदरकर, तळपे, पोलीस अंमलदार कुडके, रेड्डी, कवठेकर, मुंडे, वाघमारे, काकडे, बजबळकर, ढवळे, राऊत, महिला पोलीस हवालदार कोंडे यांनी केली आहे.