
पुणे : शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक शिस्त कायम राखण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात तीन दिवसांची विशेष मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई दि. १९ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आली, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली.
या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये एकूण ३० ठिकाणी नाकाबंदी पॉईंट उभारून वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या २०१ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी संबंधित चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. मद्यपान करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून यामुळे स्वतःचा तसेच इतर नागरिकांचा जीव धोक्यात येतो, असे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.
पुणे शहर वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचा इशाराही विभागाकडून देण्यात आला आहे.







