
न्यायालयाने सुनावली तब्बल २० वर्षांची शिक्षा
#पुणे : अल्पवयीन १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाला न्यायालयाने तब्बल २० वर्ष सक्तमजुरी आणि १५ हजार रुपयांचा दंड सुनावला. वडगाव मावळ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हे आदेश दिले.
बिसोवजित मोनीलाल देबनाथ (वय २१) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देबनाथ याने पिडीत मुलीशी ओळख करून घेतली. तिच्याशी जवळीक वाढवली. तिला विविध आमिषे दाखवीत तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनी तिला आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या. तिच्या आईने डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली. तपासणीमध्ये ही मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. आईने तिच्याशी विश्वासात घेऊन संवाद साधला असता मुलीने आरोपीविषयी माहिती दिली. देबनाथने वेळोवेळी आपल्याशी शारीरिक सबंध प्रस्थापित केल्याचे तिने आईला सांगितले. हा प्रकार समजल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने पोलिसांकडे जुलै २०१९ मध्ये फिर्याद दाखल केली.
न्यायालयात हा खटला उभा राहिला. या खटल्यात विशेष सरकारी वकील स्मिता मुकुंद चौगुले यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून पीडित मुलीची आई, मुलगी हिच्यासह आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. घडलेला गंभीर प्रकार पाहता आरोपीला सहानुभूती दाखविण्यात येऊ नये. आरोपीला अधिकाधिक शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद ॲड. चौगुले यांनी केला. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने दिलेले न्यायनिवाडे सादर केले. साक्ष आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने देबनाथला शिक्षा सुनावली. तळेगाव पोलीस ठाण्यातील तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक डी. जे नागरगोजे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अविनाश गोरे यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय्य केले.