
फटाके जपून फोडण्याचे आवाहन : काळजी घेतल्यास इजा टळू शकेल
पुणे: पुण्यात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला शिकणारी नेपाळची २० वर्षीय तरुणी मनीषा (नाव बदललेले) एका शोभेच्या फटाक्यामुळे गंभीर जखमी झाली. या घटनेत तिच्या दोन्ही डोळ्यांचे बुबुळ भाजले असून, दृष्टीही कमी झाली आहे. तिला त्वरित सिंहगड रस्त्यावरील माणिक बागेतील दुधभाते नेत्रालयात दाखल करण्यात आले.
घटना रविवारी रात्री सिंहगड रस्ता परिसरात घडली. तरुणीने विविधरंगी ठिणग्या उडणारा फटाका उदबत्तीने पेटवला, मात्र तो फटाका तिच्या चेहऱ्यावर आडवा आला आणि नंतर आकाशात गेला. या अपघातात तिच्या चेहऱ्याचा मोठा भाग भाजला असून डोळ्यांच्या आतील भागालाही गंभीर इजा झाली आहे.
नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते यांनी त्वरित तपासणी करून डोळ्याचा बाह्य व अंतर्गत भाग यांचे परीक्षण केले. त्यांनी बुबुळाचे मापन, सोनोग्राफी करून औषधोपचार सुरू केले. डॉ. दुधभाते म्हणाले, “तरुणीचे डोळ्यांचे बुबूळ भाजले आहे, दृष्टी कमी झाली आहे, परंतु शस्त्रक्रियेची गरज नाही. ही जखम दोन आठवड्यांत सुधारेल, परंतु नियमित तपासणी व औषधोपचार आवश्यक आहे. अपघातामुळे होणारा मानसिक ताणही लक्षात घेणे गरजेचे आहे.”
डॉ. दुधभाते यांनी फटाक्यांशी संबंधित खबरदारीबाबतही सूचना दिल्या: “फटाके खरेदी करताना दर्जेदार आणि सुरक्षित फटाके निवडा. फटाका उडवताना जास्तीत जास्त लांब उभे राहा. जर चेहरा भाजला किंवा डोळ्यात काही अडचण आली तर लगेच पाण्याने धुवून नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या; घरगुती उपाय करून वेळ वाया घालवू नका.”