
मोबाईल चोरट्यांकडून १९ मोबाईल हस्तगत
बंडगार्डन पोलिसांनी कामगिरी, सव्वा तीन लाखांचे मोबाईल नेले होते हिसकावून
पुणे : साधु वासवानी चौकात थांबलेल्या तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावुन नेणार्या चोरट्यांचा शोध घेत असताना बंडगार्डन पोलिसांच्या हाती सराईत चोरटे लागले़ त्या तिघा चोरट्यांना पकडून बंडगार्डन पोलिसांनी ३ लाख २३ हजार रुपयांचे १९ मोबाईल जप्त केले आहेत.
सोहेल बादशाह खान (वय २०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), आयान झाकीर शहा (वय २१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) आणि फरहान वसीम शेख (वय २०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बंडगार्डन, वानवडी, कोंढवा, मार्केटयार्ड स्वारगेट पोलीस ठाण्याकडील एकूण ८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून १९ मोबाईल फोन व दुचाकी असा ३ लाख २३ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. मोबाईल चोरण्यासाठी वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे़
साधु वासवानी चौकात थांबलेल्या तरुणाचा दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी मोबाईल हिसकावुन नेला होता. बंडगार्डन पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी व प्रकाश आव्हाड यांना हे आरोपी कोंढवा परिसरातील असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरुन पोलिसांनी कोंढव्यात शोध घेऊन तिघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात १९ मोबाईल हस्तगत केले असून त्यापैकी ८ गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित मोबाईलबाबत तपास सुरु आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त संगिता आल्फान्सो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक निलकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, मोहन काळे, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, सागर घोरपडे, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, अवधुत जमदाडे, निलेश पालवे, प्रविण पाडाळे यांनी केली आहे.