
डेक्कन पोलीस ठाण्यात कामगारावर गुन्हा दाखल
पुणे : पुण्यामधील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल देहातीमधून एक खळबळजन घटना समोर आली असून या हॉटेलमध्ये तब्ब्ल ५३ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे ईघटना जानेवारी २०२३ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत प्रभात रस्त्यावरील हॉटेल देहातीमध्ये घडली.
पोलिसांनी दिपक ज्योति नायक (रा. कोथरुड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नचिकेत अरुण चिडगोपकर (वय ४३, रा. निलकमल
सोसायटी, लताविश्व बंगला, कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिडगोपकर यांचा भागीदारीमध्ये हॉटेल व्यवसाय आहे. या हॉटेलमध्ये आरोपी दीपक नायक हा काम करीत होता. त्याने हॉटेलमधील बिलींग सॉफ्टवेअरमध्ये बिल सेटल झाल्यानंतर परत या बिलांमध्ये काही पदार्थ वगळून नव्याने एडीट केलेली बिलाची रक्कम कमी करण्यास सुरुवात केली.
ज्या ग्राहकांनी रोखीने बिल भरलेले आहे, अशी बिले कार्ड सेटलमेंटमध्ये वळवुन दैनंदिन आर्थिक अहवालाशी जुळवाजुळव केली. तसेच, खोटे हिशोब तयार करुन जमा झालेल्या रोख रकमेमधून वगळलेल्या पदार्थाएवढी रक्कम स्वतःकडे घेतली. अशा प्रकारे ५० लाख २१ हजार ७२३ रुपयांचा अपहार केला. तसेच त्याला वेळोवेळी हॉटेलमध्ये जमा झालेली रक्कम बँकेमध्ये भरण्यास दिली असता या रकमेमधून वेळोवळी ३ लाख ५० हजार रुपयांची रक्कम स्वतःकडे ठेवून एकुण ५३ लाख ७१ हजार ७२३ रुपयांचा अपहार करुन चिडगोपकर यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.