
पुणे : पुण्यातल्या टेकड्यांवर फिरायला गेलेल्या तरूणांची लूट होण्याचे प्रकार सुरूच आहेत. हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याला लुटण्यात आले. त्याला चाकूचा धाक दाखवत ३५ हजार रुपयांची सोनसाखळी लंपास करण्यात आली. रविवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका महाविद्यालयीन तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतो. तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहण्यास आहे. तो फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या हनुमान टेकडीवर फिरायला गेला होता. दुपारी साधारण पावणेचार वाजण्याच्या सुमारास टेकडीवर दोन चोरट्यांनी त्याला अडवले. जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या गळ्यातील ३५ हजारांची सोनसाखळी चोरून नेली. पुढील तपास उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत.