
पुणे: आपल्या देशात संरक्षण क्षेत्रासह कृषी, शाश्वत विकास, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रात अनेक समस्या भेडसावत आहेत. या वास्तविक समस्या निश्चित करून त्यावर उपाय शोधून भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगले संशोधन करावे, इनोव्हेशन व स्टार्टअप विकसित करावेत आणि राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे, असे मत ब्रिगेडियर सचिन कालिया यांनी व्यक्त केले. परस्पर संवाद, टीमवर्क आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुयोग्य वापर गरजेचा असल्याचेही त्यांनी नमूद केले
केंद्रीय शिक्षण मंत्रालय, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि इनोव्हेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमधील संशोधन, इनोव्हेशन आणि औद्योगिक कौशल्यांना चालना देण्यासाठी आयोजित केलेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२५ (सॉफ्टवेअर एडिशन) स्पर्धेची महाअंतिम फेरी मंगळवारी हिंजवडी येथील होप फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर संचलित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयस्क्वेअरआयटी) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी सचिन कालिया बोलत होते.
मोहिनी छाब्रिया कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी नीलसॉफ्ट कंपनीचे संचालक शशांक पाटकर, ‘एआयसीटीई’चे विभागीय अधिकारी लेफ्टनंट कमांडर अखिल शर्मा, नोडल ऑफिसर मयूर बोरकर, तेजस सोमय्या, ‘आयस्क्वेअरआयटी’च्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, उपप्राचार्या प्रा. माधुरी रेड्डी आदी उपस्थित होत्या. विविध समस्यांवर उत्तम व इनोव्हेटिव्ह उपाय शोधणार्या पाच संघांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचे रोख बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. देशभरातील २५ संघ या महाअंतिम फेरीत दाखल झाले होते.
यामध्ये टीम ८१८_चारकोल (आयआयएसटी, इंदूर), टीम डीपवाईज२५ (एसएसईसी, भावनगर), टीम एज्युबोटेक्स (सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे), टीम हाऊसऑफकोडर्स (आयआयआयटी, नागपूर) यांना प्रथम क्रमांकाचे दीड लाखाचे, तर टीम कोडडीवास (बीएनएमआयटी, बंगळुरू) आणि न्यूराएक्स (केजीआयएसएल, कोईमतूर) यांना प्रथम क्रमांकाचे विभागून दीड लाख रुपयांचे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.
ब्रिगेडियर सचिन कालिया म्हणाले, तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी शिस्त, सर्जनशीलता आणि व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टिकोनामुळे तरुणांसमोर मोठ्या संधी निर्माण होत आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा. विविध शाखांमधील तज्ज्ञता आणि टीमवर्क यातूनच नवकल्पना जन्म घेते. नाईट-व्हिजन सिस्टीम्स, थर्मल इमेजिंग, डिफेन्स प्लॅटफॉर्मसाठी डिजिटल ट्विन्स, सैनिक–साधन इंटरफेससाठी एआय-आधारित उपाय आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी रोबोटिक्स यामध्ये काम व्हावे.”
शशांक पाटकर म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, परदेशी शिक्षणातील बदलते प्रवाह आणि रोजगाराच्या संधींमध्ये होत असलेल्या परिवर्तनामुळे तरुणांना स्वतःला सातत्याने अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. भाषिक प्राविण्यासह कल्पनांतील स्पष्टता, प्रभावी सादरीकरण, कौशल्य विकास सहकार्य भावना गरजेची आहे. ‘एआय’ला साथीदार म्हणून वापरावे. प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे शेतकरी, डॉक्टर, महापालिका कर्मचारी यांसारख्या हितधारकांचे अनुभव जाणून घ्यावेत. त्यातून समस्या आणि त्यावरील उपाय सुचतात.”
अखिल शर्मा व मयूर बोरकर यांनी ‘एआयसीटीई’ची भूमिका विशद केली. डॉ. वैशाली पाटील यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रा. मीनल बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. माधुरी रेड्डी यांनी आभार मानले.





