वाघोलीमधील दहा एकरांच्या भूखंडाप्रकरणी फसवणूक, अपहरणाचे गुन्हे दाखल
पुणे : वाघोलीमधील तब्बल ९० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या दहा एकर जमिनीवरुन विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच असून शहरातील नामांकित अशा बांधकाम व्यावसायिकांची नावे या भूखंडाशी जोडली गेली आहेत. यातील आठ जणांवर नुकताच अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, ज्याने अपहरण व खंडणीची तक्रार केली होती तो तक्रारदार सध्या कारागृहात आहे. त्याच्यावर याच भूखंडाचे बनावट दस्त तयार करून ही जमीन विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. एकूणच गुंतागुंतीचे असलेले हे कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचे प्रकरण तपासाकरिता आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले होते. आता हे प्रकरण खंडणी विरोधी पथक एककडे सोपवण्यात आले आहे.
राजेश जयभगवान गोयल, नवीन जयभगवान गोयल, जयभगवान गोयल (तिघेही रा. राधाकुंज बंगला, गंगाधाम, फेज २, बिबवेवाडी), रितेश राजाराम मित्तल (रा. सत्यनारायण क्लॉथ स्टोअर, पुणे नगर रोड,कोरेगाव भिमा), निलेश राजाराम अगरवाल, किशोर भरत मित्तल (रा. सी/२०२, व्हिक्टोरिया गार्डन, कल्याणी नगर, आगाखान पॅलेस जवळ, येरवडा), रितेश सतिश अगरवाल (रा. साईकृपा फेज २, गंगाधाम), समीर इमामबक्ष मुलाणी (रा. रवि पार्क सोसायटी, जगताप चौक, वानवडी), स्वप्निल उत्तम रांजणे (रा. अजनुज गाव, खंडाळा, सातारा, सध्या रा. मोहन अपार्टमेंट, पाषाण बाणेर लिंक रोड), सोहेल शेख (रा. शांती रक्षक सोसायटी, येरवडा), अमजद सय्यद (रा. शांती रक्षक सोसायटी, येरवडा), शोएब शेख (रा. अंबर बेकरी, शांती रक्षक सोसायटीसमोर, येरवडा), फिरोज खान (रा. येरवडा), उस्मान खान (रा. सय्यद नगर, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांवर वानवडी पोलीस ठाण्यात एकूण १३ जणांवर भान्यासं ११९, १२७(२), १३८, १४० (१), ३०८ (३) (५), ६१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष डांगे यांनी फिर्याद दिली आहे.
हा प्रकार ऑक्टोबर २०२४ ते मे २०२५ हा कालावधीत रेसकोर्स याठिकाणी घडला. जमीन व्यवहारासाठी दस्त नोंदणी करून जमीन विक्री करावी याकरिता शहरातील या नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी आपसात कट रचून जॅक्सन दास नावाच्या व्यक्तीच्या कुटुंबाला वेठीस धरले. त्याने व दास परिवाराने त्यांचे बरोबरच दस्त नोंदणीचा पुढील व्यवहार करावा तसेच हेमंत कामठे व इतर ४ यांचेबरोबरचा व्यवहार रद्द करावा याकरीता जॅक्सन दास यास लोणावळा येथे नेले व त्याचा मुलगा रोहित दास याला लोणावळा येथे बोलावून रोहित दास यास १ दिवस डांबून ठेवले. नोएल दास व त्याच्या परिवारास लुधियाना येथून दस्त नोंदणीकरीता घेऊन नआल्यास रोहित दास याला सोडणार नाही अशी धमकी दिली. तसेच, जॅक्सन दास यास तात्काळ लुधियाना येथे जाण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
वाघोली येथे अपर्णा वर्मा नावाच्या महिलेने १९९० साली दहा एकर जमीन खरेदी केली होती. वर्मा या दुबईमध्ये राहतात. त्या दुबईमध्ये शाळा चालवितात. त्या भारतात रहात नसल्याचा गैरफायदा घेत जॅक्सन दास याने बनावट कागदपत्र तयार केली. ही कागदपत्रे खरी आहेत असे भासवून त्याने ही जमीन विक्रीसाठी असल्याचे भासवले. सुरुवातीला त्याने गोयल, मित्तल आणि अगरवाल यांना ही जमीन विकण्यासाठी करारनामा केला. या जागेचे बाजारमूल्य ९० कोटी होते. मात्र, गोयल, मित्तल, अगरवाल आदींनी प्रत्यक्षात २४ कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार ठरवला. प्रत्यक्षात जॅक्सन याला अडीच कोटी रुपये दिले. काही दिवसांनी त्याने अधिक पैसे देणारे दुसरे खरेदीदार शोधण्यास सुरुवात केली. या जमिनीच्या विक्रीबाबत हेमंत कामठे व अन्य लोकांशी करारनामा केला. त्याने गोयल, मित्तल, अगरवाल आदींशी केलेला करारनामा रद्द केला नव्हता. त्यामुळे त्यांचा जॅक्सन दास याच्याशी वाद झाला. गोयल, मित्तल, अगरवाल आदींनी फौजदारी कट रचत जमीन बळकवण्याच्या उद्देशाने दास व त्याच्या मुलाला लोणावळा येथे नेले. मुलाला अपहरण करून डांबून ठेवल्याची तक्रार दास याने दिली होती. त्याचा तपास सुरू करण्यात आला होता.
मूळ जागा मालकाकडून दास याच्यावर गुन्हा
मूळ जागा मालक असलेल्या अपर्णा वर्मा यांच्या जागेचे बनावट दस्त तयार करून अनेक वेळा ही जमीन विकण्याचा प्रयत्न झाला. तब्बल पाच वेळा बनावट आधार कार्ड तयार करून ५ बनावट अपर्णा वर्मा उभ्या करण्याचा देखील प्रकार घडला. जागेचा ताबा मिळवण्यासाठी प्रक्रिया देखील सुरू झाली. या सर्व कायदेशीर पेचामधून मार्ग काढत मूळ मालक असलेल्या वर्मा यांनी जॅक्सन दास याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्या तक्रारीवरून दास याला ५ ऑगस्ट रोजी अटक झाली. सध्या तो कारागृहात आहे. सातबारा देखील तिच्याच नावावर होता. दरम्यान, वर्मा यांनी त्यांची जागा सॉलिटेअरचे अतुल चोरडिया यांना मे महिन्यात विकली. ८ मे रोजी त्यांचे खरेदीखत झाले. त्यानंतर देखील जॅक्सन दास याने जागेवर दावा केला होता.