
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याचे भूमिपुत्र तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख आणि सुप्रसिद्ध सिने-पार्श्वगायक, लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांना लोककला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला आहे. याच अनुषंगाने मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाऊंडेशन, महात्मा गांधी मिशन, अभ्युदय फाऊंडेशन व नागरिकांच्या वतीने डॉ. गणेश चंदनशिवे यांचा महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम यांच्या हस्ते व ज्येष्ठ अभिनेते प्रा. डॉ. दिलीप घारे, डॉ. दिलीप महालिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. २१ जून २०२५ रोजी, रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल.
मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख म्हणून डॉ. चंदनशिवे सध्या जबाबदारी सांभाळीत आहे. विख्यात तालवादक तौफिक कुरेशी, अजय-अतुल, शंकर महादेवन यांच्याबरोबर लोकसंगीताच्या अनेक रचना डॉ. चंदनशिवे यांनी गायल्या आहेत. संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटासाठी पोवाडा, शाहीरी काव्य लिहिले असून त्याचे सादरीकरणदेखील केले आहे.
डॉ. चंदनशिवे यांनी लोककलेच्या जतन आणि प्रसारात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यामुळे लोककलांना शहरी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे. एक गायक म्हणून त्यांनी आपल्या आवाजातून अनेक लोकगीते घराघरात पोहचवली आहेत. मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे प्रमुख म्हणून त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे लोककलांना शैक्षणिक आणि व्यावसायिक महत्व प्राप्त झाले आहे.
सत्कार सोहळ्यानंतर डॉ. चंदनशिवे यांचे विशेष कला सादरीकरण होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नीलेश राऊत, प्रा. दासू वैद्य, डॉ. रेखा शेळके, प्रेरणा दळवी, डॉ. शिव कदम, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. कैलास अंभुरे, सुबोध जाधव, मंगेश निरंतर, श्रीकांत देशपांडे, डॉ. राजू सोनवणे, अविनाश रावते आदींनी केले आहे.