
जिंकला हॉकी एशिया कप २०२४ चा किताब,
अंतिम फेरीत पाकिस्तानचा ५-३ ने पराभव
नवी दिल्ली : भारतीय पुरुषांच्या जूनियर हॉकी संघाने २०२४ च्या एशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात भारतासाठी अराइजित सिंग याने अप्रतिम कामगिरी करत ४ गोल केले, तर दिलराज सिंग याने एक गोल केला. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत सामना बरोबरीत होता, पण चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने प्रभावी पुनरागमन करत हा सामना जिंकला. भारताने पाचव्यांदा हा किताब जिंकला आहे.
सामन्याची सुरुवात आणि पहिले क्वार्टर
या सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानकडून करण्यात आला. पाकिस्तानसाठी हनान शाहित याने तिसऱ्या मिनिटाला गोल करत आघाडी घेतली. मात्र, भारताने लगेचच पुनरागमन केले. चौथ्या मिनिटाला अराइजित सिंग याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला १-१ ची बरोबरी साधून दिली. पहिला क्वार्टर संपल्यावर सामना १-१ च्या स्थितीत होता.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताची आघाडी
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक खेळ करत आघाडी घेतली. अराइजित सिंग यांनी पुन्हा पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला २-१ ने आघाडीवर नेले. नंतर दिलराज सिंग यांनी १९ व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी ३-१ ने वाढवली. पाकिस्तानकडून सूफियान खान यांनी ३० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत अंतर कमी केले. दुसऱ्या क्वार्टरअखेर भारत ३-२ ने पुढे होता.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये बरोबरी
तिसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानने चांगली कामगिरी केली. सूफियान खान यांनी 39व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामना ३-३ ने बरोबरीत आणला.
चौथ्या क्वार्टरमध्ये भारताचा विजय
चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. अराइजित सिंग यांनी ४७ व्या आणि ५४ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल करत भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली. अखेरीस भारताने पाकिस्तानचा ५-३ ने पराभव करत किताब जिंकला.
भारताचा पाचव्यांदा किताब
भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा मेन्स जूनियर एशिया कप जिंकला आहे. याआधी भारताने २०२३, २०१५, २००८ आणि २००४ मध्येही हा किताब पटकावला होता.
टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे.