गुन्हेगाराकडून माहिती उघड होताच धरपकड : ९५ रेशनकार्ड, ११ आधार कार्डसह विविध कागदपत्रे असा ८९ हजार २० हजारांचा मुद्देमाल जप्त
पुणे : कारागृहात असलेल्या गुन्हेगारांसाठी न्यायालयात बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन मिळवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. जामीनासाठी कागदपत्रे तयार करण्यापासून ते न्यायालयात सर्व चित्र खरे असल्याचे भासवून न्यायालयाची दिशाभूल करीत अनेकांना आजवर जामीन मिळवून देण्यात आले. पोलिसांनी हे रॅकेट उद्धवस्त करत २ वकिलांसह ११ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या रॅकेटमध्ये वकिलांसोबतच न्यायालयातील कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती परिमंडळ पाचचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.
अॅड. असलम गफुर सय्यद (वय ४५, रा. वैदुवाडी, हडपसर) आणि अॅड. योगेश सुरेश जाधव (वय ४३, रा. हडपसर) अशी अटक वकिलांची नावे आहेत. बनावट व चोरुन रबरी शिक्के तयार करुन देणारा दर्शन अशोक शहा (वय ४५, रा. सोलापूर बाजार, कॅम्प) या दुकानदारासह एकेरी पानाचे रेशन कार्ड प्राप्त करुन देणारे पिराजी ऊर्फ चंद्रकांत मारुती शिंदे (वय ६०, रा. भारतमाता चौक, मोशी, ता. हवेली) आणि गोपाळ पुंडलीक कांगणे (वय ३५, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनाही गजाआड करण्यात आले आहे. शहाकडून ९ रबरी शिक्के व मशीन जप्त करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी फरहान ऊर्फ बबलु शेख (रा. वैदवाडी, हडपसर) आणि अॅड. नरेंद्र जाधव आहेटत. सय्यद व योगेश जाधव यांनी शेख व नरेंद जाधव यांच्याशी संगनमत केले. काही जणांना या रॅकेटमध्ये सहभागी करून घेतले. त्याआधारे बनावट जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यास सुरुवात केले. जामीनाचा मोबदला म्हणून रोख स्वरुपात लाखो रुपये उकळण्यात आल्याचा कबुली जबाब न्यायालयीन कोठडीत असलेल्या संतोषकुमार शंकर तेलंग याने न्यायालयात १५ जानेवारी रोजी दिला. त्यावरुन पोलिसांनी ही कारवाई केली.
पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे म्हणाले, की गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या गुन्हेगारांसाठी जामीनदार होण्यासाठी लोक घाबरतात. त्यांना आवश्यक असलेला लायक जामीन मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे अशा गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी या वकीलांनी बनावट जामीनदार पुरवण्याचे रॅकेट तयार केले. वानवडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धनाजी टाणे पुढील तपास करत आहेत.
अशी होती ‘मोडस ऑपरेंडी’
बनावट जामीनदार न्यायालयात येणार्या गुन्हेगारांच्या नातेवाईकांना हेरायचे. त्यांच्याशी जामीन मिळवून देण्याबाबत बोलणी करून आर्थिक व्यवहार केला जायचा. त्यानंतर, या टोळीमार्फत बनावट जामीनदारांचे दुसर्या नावाने आधार कार्ड, रेशन कार्ड व ऑनलाईन ७/१२ वरील नावात बदल करुन कागदपत्रे तयार केली जायची. रेशनकार्ड खरे वाटावे, याकरिता त्यावर पुरवठा विभागाच्या उपायुक्तांचे रबरी शिक्के मारले जायचे. त्यावर खोटी सही केली जायची. अशा प्रकारे त्यांचे प्रतिज्ञापत्र तयार करुन संबंधित न्यायालयातील सहायक अधीक्षक (नाझर) यांच्याकडून बनावट कागदपत्रे पडताळणी करुन खरे असल्याचे प्रमाणित करून घ्यायचे. न्यायालयासमक्ष जामीनदारांना हजर केल्यावर वकील व बनावट जामीनदार खरे असल्याचा भास निर्माण करीत तसेच न्यायालयाची दिशाभूल करुन कारागृहामधील गुन्हेगारांना जामीन मिळवून देत असत.
असा लागला सुगावा?
वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला पोलिसांना बनावट जामीनदारांच्या रॅकेटबाबत खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने ४ जानेवारी रोजी लष्कर न्यायालयाच्या आवारात सापळा लावण्यात आला. संतोषकुमार शंकर तेलंग याच्यासह ५ बनावट जामीनदारांना हेरून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचा साथीदार व मुख्य आरोपी फरहान ऊर्फ बबलु शेख (रा. वैदवाडी, हडपसर) हा गर्दीचा फायदा घेऊन निसटण्यात यशस्वी झाला. आतापर्यन्त या कारवाईत पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.
तपासाची पुढील दिशा
बनावट रेशनकार्ड, आधार कार्ड याद्वारे न्यायालयातून कोणकोणत्या आरोपींना आजपर्यंत जामीन मिळाला व त्याकामी आरोपींना कोणी कोणी मदत केली, याची माहिती न्यायालयाकडून प्राप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये न्यायालयातील काही वकिलांचा व कोर्टातील स्टाफचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात दोघा वकिलांना अटक केली आहे.
