
नामांकित शिक्षण संस्थेतील सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू : एकाचे शीर झाले धडापासून वेगळे
देहरादून : देहरादून येथील एका भीषण अपघातात नामांकित शिक्षण संस्थेतील सहा तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन तरुणींचा समावेश आहे. हे सर्व तरुण साधारण १८ ते २४ या वयोगटातील होते. हे सर्व दिल्ली, देहरादून आणि हिमाचल प्रदेश येथील रहिवासी होते. हा अपघात एवढा भयंकर होता की एकाचे शीर धडापासून वेगळे झाले. ‘ओएनजीसी चौक’ येथे सोमवारी रात्री घडलेल्या अपघातामुळे वाहनांच्या वेगाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
कुणाल कुकरेजा (वय २३, रा. चंबा, हिमाचल प्रदेश), गुनीत (वय १९, रा. साई लोक, जीएमएस रोड, देहरादून), नव्या गोयल (वय २३, रा. आनंद चौक, तिलक रोड), अतुल अग्रवाल (वय २४, रा. कालिदास रोड, देहरादून), कामाक्षी (वय २०, रा. कावली रोड, देहरादून), ऋषभ जैन (वय २४, रा. राजपुर रोड, देहरादून) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या दुर्घटनेत सिद्धेश अग्रवाल (वय २५, रा. राजपुर रोड, देहरादून) हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात एक भरधाव कंटेनर आणि इनोवा गाडीमध्ये झाला. या दोन्ही वाहनांची जोरात धडक झाली. घटनास्थळावर अपघातग्रस्त मोटार आणि कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतले. कंटेनर चालक पसार झाला आहे. त्याला नंबर प्लेट देखील नव्हती. मोटारीमध्ये एकूण सात जण प्रवास करीत होते. त्यापैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी अवस्थेत आढळला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून अपघात नेमका कसा घडला याचा तपास केला जात आहे.