
पुणे : दिवाळी आणि छट पूजा या सणांच्या निमित्ताने आपापल्या गावी जाणाऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन तसेच प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेने ७४० विशेष ट्रेन सेवांची घोषणा केली आहे. यातील २३३ ट्रेन सुरू झालेल्या असून ५०७ स्पेशल ट्रेन्सची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये वातानुकूलित विशेष, वातानुकूलित, शयनयान आणि जनरल डब्यांच्या मिश्र संयोजन असलेल्या गाड्या आणि अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. दिवाळी/छट पूजा सणासाठी, मुंबई, पुणे, नागपूर इ. येथून देशभरातील विविध स्थळांसाठी विशेष गाड्या चालवल्या जात असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
मुंबईतून एकूण ३६३ ट्रेन पाठवण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी २५२ ट्रेन पाठविण्यात आल्या. आणखी १११ ट्रेन चालवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातून ३२७ ट्रेन जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २२१ ट्रेन चालल्या आहेत. तर, आणखी १०६ ट्रेन चालवल्या जाणार आहेत. नागपूर, लातूर, दौंड इत्यादी ठिकाणांहून ५० ट्रेन जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३४ ट्रेन चालल्या आहेत आणि आणखी १६ चालवणार आहेत. महाराष्ट्रातील लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने १२५ गाड्या जाहीर केल्या आहेत. त्यापैकी १०७ सेवा पूर्ण झाल्या आहेत. आणखी १८ सेवा चालवल्या जाणार आहेत.
उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळा, संत्रागाछी आणि इतर ठिकाणी ५५१ सेवा जाहीर केल्या आहेत ज्यातील ३५६ सेवा पूर्ण झाल्या आहेत आणि आणखी १९५ सेवा चालवल्या जातील. दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने करीमनगर, कोचुवेली, काझीपेट, बेंगळुरू आणि इतर गंतव्यस्थानांसारख्या विविध ठिकाणी ६४ सेवा जाहीर केल्या आहेत ज्यापैकी ४४ सेवा पूर्ण झाल्या आहेत आणि आणखी २० सेवा चालवल्या जातील.