
#वॉशिंग्टन : टाईम्स मासिकाने पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे. याअगोदर २०१६ मध्येदेखील ट्रम्प यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली होती. या ठिकाणी हे सांगणे महत्त्वाचे आहे की टाईम पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणीही निवडले जाऊ शकते, त्या व्यक्तीचे चांगले काम केलेले असावे अशी अट नसते.
पर्सन ऑफ द इयर बनल्यानंतर ट्रम्प आता न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या ट्रेडिंग डेची सुरुवातीची घंटा वाजवतील. कोणत्याही व्यक्तीसाठी हा मोठा सन्मान मानला जातो. यंदाच्या पुरस्कारासाठी ट्रम्प, कमला हॅरिस, एलन मस्क, बेंजामिन नेतन्याहू आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडल्टन यांच्यात स्पर्धा होती. गेल्या वर्षी पॉप स्टार टेलर स्विफ्टला पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले होते.
ट्रम्प यांनी टाईम्स मॅगझिनवर अनेकदा टीका केली आहे
डोनाल्ड ट्रम्प आणि टाईम मॅगझिन यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. यावर ट्रम्प यांनी अनेकदा टीका केली आहे. २०१२ मध्ये, त्यांनी सांगितले की टाइम मासिकाने १०० सर्वात शक्तिशाली लोकांमध्ये त्यांचा समावेश न केल्याने सर्व विश्वासार्हता गमावली आहे. २०१५ मध्ये, जेव्हा तत्कालीन जर्मन चान्सलर अँजेला मर्केल पर्सन ऑफ द इयर बनल्या, तेव्हा ट्रम्प यांनी ट्विटरवर लिहिले, आता त्यांनी जर्मनीची नासधूस करणाऱ्या व्यक्तीला निवडून दिले आहे.
२०१६ मध्ये पर्सन ऑफ द इयर बनल्याबद्दल ट्रम्प यांनी हा मोठा सन्मान असल्याचे म्हटले आहे. पुढच्या वर्षी, ट्रम्प म्हणाले की जर मी मुलाखत आणि फोटोशूटसाठी सहमती दिली असती तर २०१७ मध्येही त्यांना ही पदवी दिली गेली असती. मात्र टाईम मासिकाने हा दावा फेटाळून लावला आहे.