
घरगुती पद्धतीने बनविलेल्या लज्जतदार शाकाहारी, मांसाहारी पदार्थांची पुणेकरांना चाखता येणार चव
#पुणे : जीएसबी संयुक्त कोंकणी सभा, पुणेतर्फे खवैयांसाठी रविवार, दि. १ डिसेंबर २०२४ रोजी कोंकणी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंतच्या लज्जतदार आणि चविष्ट शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थांची खास चव या फूड फेस्टिव्हलमध्ये चाखता येणार आहे.
या फूड फेस्टिव्हलमध्ये असणारे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ हे सारस्वत समाजातील महिला आणि पुरुषांनी स्वत: बनविलेले असणार आहेत. डेक्कन जिमखाना, आपटे रोड वरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे दुपार 2 ते रात्री 9 या वेळात फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या फूड फेस्टिव्हलला खवैय्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असून फेस्टिव्हलचे यंदाचे सातवे वर्ष आहे.
या फूड फेस्टिव्हलमध्ये व्यावसायिकांचा सहभाग नसून सारस्वत समाजातील महिला तसेच पुरुषांनी घरगुती पद्धतीने बनविलेले पदार्थाचें ४० स्टॉल्स असणार आहेत. सारस्वत समाजातील महिलांमध्ये उद्योजकता वाढीस लागावी आणि किनारपट्टीवरील उत्तमोत्तम खाद्य पदार्थांची मेजवानी खवैय्यांना मिळावी या हेतून दरवर्षी फूड फेस्टिव्हल आयोजित करण्यात येत असल्याचे जीएसबी संयुक्त कोंकणी सभेचे अध्यक्ष अरुण किणी आणि उपाध्यक्ष जनार्दन भट यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. खाद्य पदार्थ बनविताना दर्जा आणि चवीची हमी ग्राहकांना दिली जाते.
या वर्षीच्या फूड फेस्टिव्हलमध्ये खवैय्यांचे रचनारंजन करणारे वैशिष्ट्यपूर्ण कोंकणी पदार्थ :
मांसाहारी : सुरमई करी, प्रॉन्स करी, सुरमई फ्राय, प्रॉन्स फ्राय, स्टफ्ड पोमफ्रेट, पोमफ्रेट काफ्रेल, चिकन घी रोस्ट, बांगडा अम्शे तिक्शे, भात, मासे करी आणि तळलेल्या माशांसह फिश राईस प्लेट.
शाकाहारी : पत्रडो, खतखते, गोंय्या स्टाईल उसळ, मंगळूर बन्स कुर्मा, लोण्यासह कांदा भाकरी.
मिठाई : शेवई रोसू, पातोळी, तवसळी, मनगणं, सुकरुंडे, लाडू, मांडे, चिरोटे, आईस्क्रीम
घरगुती उत्पादने : विविध प्रकारची लोणची (आंबा, हळद, आवळा, अननस, फ्लॉवर), विविध प्रकारच्या चटण्या (कारळ, सेंद्रिय जवस), कशाय पावडर, निखालस मसाले, पापड, वडी.
जीएसबी संयुक्त कोंकणी सभेने आयोजित केलेला फूड फेस्टिव्हल सर्वांसाठी खुला असल्याने पुणेकरांनी फूड फेस्टिव्हलमधील खाद्यपदार्थांचा आस्वाद चाखावा, असे आवाहन करण्यात आले आहे.