
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या
माजी आमदार मोहन जोशी यांची मागणी
पुणे : पुणे विभागात चार हजारहून जास्त मतदान यंत्रे नादुरुस्त असल्याची माहिती उघड झाली आहे. ही परिस्थिती पहाता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) घ्याव्यात, अशी मागणी माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे आज (शुक्रवारी) केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुमारे चार, पाच वर्षांनी होत आहेत. ते सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने, राज्य सरकारला निवडणुका घ्या, असा आदेश दिल्याने होणार आहेत. सत्ताधारी भाजप सरकारला अपयशाची भीती वाटत असल्याने ते निवडणुका पुढे ढकलण्याच्याच प्रयत्नात आहेत. या निवडणूक यंत्रणेत गडबडी होऊ नयेत, यासाठी काँग्रेस पक्ष लक्ष ठेवून आहेच, असे मोहन जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.
पुण्यासह पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत साडेचार हजार मतदान यंत्रे (ईव्हीएम मशीन) नादुरुस्त असल्याची माहिती उघड झाली आहे. अशी नादुरुस्त यंत्रे दुरुस्त करून मतदान घेतले जाणार आहे. पण, या पद्धतीबद्दलच आम्हाला शंका आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी ‘वोट चोरीचे’ घोटाळे अलीकडेच पुराव्यानिशी उघड केले आहेत. निवडणूक आयोग त्यावर समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाही, अशा पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हाला ईव्हीएम मशीनवर नकोतच, बॅलेट पेपरवरच व्हाव्यात, अशी स्पष्ट मागणी जोशी यांनी केली आहे.