
तब्बल २९ वर्षांचा संसार मोडला : वयाच्या ५७ व्या वर्षी विभक्त झाल्याने आश्चर्य
मुंबई : प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी पत्नी सायरा बानोपासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली आहे. रात्री उशिरा रहमान आणि सायरा बानोच्या घटस्फोटाच्या आलेल्या बातम्यांनी सर्वांनाच धक्का दिला. त्यांच्या मुलांची लग्न देखील झालेली आहेत. वयाच्या या टप्प्यावर एकत्र राहण्याऐवजी जगप्रसिद्ध संगीतकाराने पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ए. आर. रहमान आणि सायरा बानू यांचा निकाह १२ मार्च १९९५ रोजी झाला होता. त्यावेळी रहमान २७ वर्षांचे होते आणि सायरा २१ वर्षांची होती. त्यांनी पारंपरिक पद्धतीने विवाह (अरेंज्ड मॅरेज) केला होता. आईच्या पसंतीने रहमान यांनी सायरा बानो यांच्याशी निकाह केला होता. या जोडप्याला तीन मुले आहेत. यामध्ये खतीजा आणि रहीमा या दोन मुली तर अमीन या मुलाचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांनी मुलगी खातीजाचा जंगी विवाह सोहळा आयोजित केला होता.
ए. आर. रहमान जगभर प्रसिद्ध असलेले संगीतकार आहेत. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘जय हो’ गाण्यामुळे त्यांनी ऑस्कर पुरस्कार देखील मिळवला होता. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत दिलेले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ए. आर. रहमान यांनी एकूण संपत्ती २८० मिलियन डॉलर (२१०० कोटी रुपये) आहे. वयाच्या या टप्प्यावर या जोडप्याने एकमेकांना सोडण्याचा निर्णय का घेतला याबद्दल हिन्दी सिनेक्षेत्रासह दाक्षिणात्य सिनेमा विश्वात चर्चा रंगल्या आहेत.
सायरा बानूंच्या वकील वंदना शाह म्हणाल्या, की विवाहाच्या अनेक वर्षांनंतर, सायरा आणि त्यांचे पती ए. आर. रहमान यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या संबंधात आलेल्या तणावानंतर घेतला गेला आहे. एकमेकांबद्दल आत्यंतिक प्रेम असतानाही या जोडप्याने नात्यातील तणाव आणि अडचणींमुळे दरी निर्माण झाल्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे शाह म्हणाल्या. त्यानंतर, ए. आर. रहमान यांनीही सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा करीत एक संदेश प्रसारित करून त्याला पुष्टी दिली.
मागील अभिनेता आशीष विद्यार्थी यांनीही वयाच्या ६० व्या वर्षी आपली पहिली पत्नी राजोशीपासून विभक्त होण्याची घोषणा केली होती. त्यांनी आसामच्या रुपाली बरुआसोबत लग्न केले. २०२१ मध्ये अभिनेता आमिर खानने १६ वर्षांच्या वैवाहिक जिवनानंतर आपली दुसरी पत्नी किरण रावपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. पुढे त्यांनी घटस्फोट घेतला.