
तोडफोड; टीव्ही, बेड, फ्रीज केला लंपास
पुणे | दि. १८ जुलै : चित्रपट अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या मावळ तालुक्यातील तिकोना गावाजवळील पवना धरणालगतच्या फार्महाऊसवर चोरी आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चार महिन्यांनंतर फार्महाऊसला भेट दिल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. मुख्य दरवाजा फोडून चोरी; टीव्ही, पलंग, फ्रिज आणि सीसीटीव्हीही यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली आहे.
संगीता बिजलानी यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जात नमूद केल्यानुसार, वडिलांच्या तब्येतीमुळे फार्महाऊसला चार महिने जाऊ शकले नाही. आज दोन मोलकरीणींना सोबत घेऊन फार्महाऊसला गेले असता मुख्य दरवाजा तोडलेला दिसला. आत शिरल्यावर खिडक्यांचे गज तोडलेले होते, एक टीव्ही सेट गायब होता तर दुसरा मोडलेला होता. वरच्या मजल्यावर संपूर्ण तोडफोड करण्यात आली होती. सर्व बेड फोडलेले होते. अनेक वस्तू चोरीस गेलेल्या किंवा नष्ट झालेल्या होत्या. फ्रिजसह सीसीटीव्हीही उपकरणांचीही तोडफोड झाली होती.
लोणावळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले की, पोलिसांची एक टीम फार्महाऊसवर पाठवण्यात आली आहे. नुकसानीचा पंचनामा आणि चोरीची रक्कम निश्चित झाल्यानंतर गुन्हा नोंदवला जाईल. पोलीस यंत्रणेमार्फत गावातील आणि परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. चोरी नेमकी कोणत्या काळात झाली, आणि त्यामागे स्थानिक चोरटयांची वा गुन्हेगारी टोळी आहे का, याची चौकशी केली जात आहे. पवना धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर फार्महाऊस आहेत. याठिकाणी अनेक बॉलीवूड कलाकार, व्यावसायिक आणि मोठ्या व्यक्तींचे गुंतवणूक प्रकल्प आहेत. मात्र, कमी वस्ती व फार्महाऊस बंद असताना चोरी आणि तोडफोडीचे प्रकार वाढत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.




